दिल्ली, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या शिष्टमंडळाने ही काल राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळाने नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्याचे पत्र सादर केले. तसेच यावेळी एनडीएच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली.
https://twitter.com/AHindinews/status/1799099965995905307?s=19
शिष्टमंडळात या नेत्यांचा समावेश
या शिष्टमंडळात जेपी नड्डा यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शहा, अश्विनी वैष्णव, सीएन मंजुनाथ, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, अजित पवार, राजीव रंजन सिंग, संजय झा, एकनाथ शिंदे, रामदास आठवले, एचडी कुमारस्वामी, चिराग पासवान, जितन राम मांझी, पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, जयंत बासुमातारी, अतुल बोरा, इंद्र हंग सुब्बा, सुदेश महातो आणि चंद्र प्रकाश चौधरी यांसारख्या नेत्यांचा समावेश होता.
मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी येत्या 9 जून रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. “मी देशवासियांना खात्री देतो की 18 व्या लोकसभेतील आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही त्याच गतीने आणि समर्पणाने देशाच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. एनडीएची नुकतीच बैठक झाली आणि एनडीएच्या सर्व सहकाऱ्यांनी मला पुन्हा एकदा या जबाबदारीसाठी पसंती दिली असून एनडीएच्या सर्व सहकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली,” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
राष्ट्रपतींनी मला बोलावले आहे आणि मला नियुक्त पंतप्रधान म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे आणि शपथविधीसाठी मला माहिती दिली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. “मी राष्ट्रपतींना सांगितले आहे की, 9 जून संध्याकाळी आम्हाला सोयीचे होईल, तोपर्यंत आम्ही मंत्रिपरिषदेची यादी राष्ट्रपतींना सादर करू आणि त्यानंतर शपथविधी होईल,” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 18 वी लोकसभा ही एक प्रकारे नवी ऊर्जा, तरुणाईची ऊर्जा आणि काहीतरी साध्य करण्याच्या इराद्याने असलेली लोकसभा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. हीच 25 वर्षे म्हणजे आमच्या अमृत काळाची 25 वर्षे आहेत, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.