दिल्ली, 09 जून: (विश्वजीत खाटमोडे) नरेंद्र मोदी आज देशाच्या पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यासाठी आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची तयारी सध्या पूर्ण झाली आहे आहे.
दिल्लीत चोख बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज आणि उद्या ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी सार्क सदस्य देशांतील मान्यवरांना निमंत्रण दिल्यामुळे राष्ट्रीय राजधानी सध्या हाय अलर्टवर आहे. यासाठी दिल्लीमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1799275384640593953?s=19
हे अतिथी उपस्थित राहणार
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवर पाहुणे म्हणून बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस या देशांतील प्रमुख नेते पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1799620196178829511?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1799623248117989728?s=19
महात्मा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली
राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी नरेंद्र मोदी आज दिल्लीतील राजघाटावर पोहोचले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अटल स्मारकावर जाऊन अटलबिहारी वाजपेयींना पुष्पहार अर्पण केला. शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी अटल स्मारकावर पोहोचले आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयींना पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहिनी. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी यावेळी आगंतुक पुस्तकावर स्वाक्षरी केली.