पुणे, 28 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (दि.29) पुण्यात जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी हे उद्या पुण्यात सभा घेणार आहेत. ही सभा 29 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातील रेस कोर्स मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर भारतीय जनता पार्टीकडून सध्या रेस कोर्सवर होणाऱ्या या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भाजपच्या वतीने पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
https://twitter.com/airnews_pune/status/1782760603498483872?s=19
https://twitter.com/DheerajGhate/status/1784158093015753105?s=19
चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची सभा
दरम्यान, नरेंद्र मोदी यांची उद्या बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिले आहे. तसेच मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे उद्या पुण्यात येणार आहेत.
कोणत्या मतदारसंघात कशी लढत?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात लढत होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यात सामना रंगणार आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यात लढत आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत असणार आहे.