नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे, 10 मे: (विश्वजीत खाटमोडे) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टाने 11 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी कोर्टाने पुराव्याअभावी तिघांची या आरोपातून निर्दोष सुटका केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दाभोलकर हे 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुल याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.

पाच जणांना अटक केली होती

त्यानंतर या प्रकरणात 2016 ते 2019 या कालावधीत सचिन अंदुरे, शरद कळसकर, वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या 5 जणांना सीबीआयने अटक केली होती. 2021 मध्ये त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा आज निकाल लागला. यामध्ये कोर्टाने शरद कळसकर आणि सचिन अंडूरे या दोघांना 5 लाख रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हायकोर्टात दाद मागणार

दरम्यान नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालावर दाभोलकर परिवाराने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या प्रकरणात तीन आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या तीन आरोपींच्या सुटकेच्या विरोधात आपण हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *