पुणे, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात शुक्रवारी (दि.17) सकाळी झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका आयशर टेम्पोने मॅक्स ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर हा मॅक्स ऑटो रस्त्यात बाजूला थांबलेल्या एसटी बसवर जाऊन आदळला. या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत, याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
https://x.com/ANI/status/1880144904648835305?t=v1XIClNuycvXxLCsp3Z8Bw&s=19
जखमी रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस तसेच स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सध्या हे मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष आहे. तसेच मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
पोलिसांनी दिली माहिती
आज सकाळी दहाच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळ पुणे- नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. त्यावेळी हा मॅक्स ऑटो नारायणगावकडे जात असताना एका आयशर टेम्पोने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या एसटी बसवर जाऊन आदळले, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, ही एसटी बस ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्यात थांबली असल्याचे सांगितले जात आहे. दुर्दैवाने या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वाहनचालक फरार
दरम्यान, या अपघातानंतर सबंधित टेम्पो चालक फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा टेम्पो चालक लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या अपघाताच्या सविस्तर कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू आहे.