मुंबई, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात असंतोष निर्माण होण्याची शक्यता देखील नारायण राणे यांनी व्यक्त केली. तर नारायण राणे हे आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते या विषयावर त्यांची सविस्तर भूमिका मांडणार आहेत. याची माहिती नारायण राणे यांनी ट्विट करून दिली आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1751473883281305975?s=19
नारायण राणे ट्विटमध्ये काय म्हणाले?
“मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन,” असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे नारायण राणे हे यासंदर्भात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ यांची देखील नाराजी!
तत्पूर्वी, सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण शनिवारी (दि. 27) मागे घेतले. त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी यावेळी सरकारच्या या अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचे आवाहन ओबीसी समाजाला केले होते. “मराठा समाजाला ओबीसीच्या 17 टक्के आरक्षणात आल्याचा आनंद मिळतोय. तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या. या 17 टक्क्यांमध्ये 80-85 टक्के लोक येतील. EWS अंतर्गत 10 टक्के आरक्षण मिळत होतं. ते यापुढं मिळणार नाही. सोबतच ओपनमधील 40 टक्के आरक्षण देखील मिळणार नाही. त्यामुळे EWS चे 10 टक्के आणि ओपनमधील 40 टक्के असे एकूण 50 टक्के आरक्षणात तुम्हाला असलेली तुम्ही संधी गमावून बसलात,” असे छगन भुजबळांनी म्हटले होते.