रत्नागिरी, 18 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली आहे. या भाजपकडून यादीत नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नारायण राणे हे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर नारायण राणे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1780835535474336145?s=19
https://twitter.com/samant_uday/status/1780832270599041216?s=19
किरण सामंत यांची माघार
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना आता भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. तत्पूर्वी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, किरण सामंत यांनी आज लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली तर शिवसेना म्हणून प्रामाणिकपणे काम करीत राहू, असे उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र, यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजपने प्रथमच उमेदवार दिला आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. विनायक राऊत यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना हॅटट्रिक साधण्यापासून रोखतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.