मुंबई, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयाच्या इमारतीला लावलेल्या जाळीवर उडी मारली. गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवळ हे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी समाजाच्या काही आमदारांनी आंदोलन केले सुरू होते. यादरम्यान नरहरी झिरवाळ यांच्यासह चार आमदारांनी शुक्रवारी (दि.04) मंत्रालयाच्या इमारतीला लावलेल्या जाळीवर उडी मारली.
https://x.com/PTI_News/status/1842119048701587913?t=QOb7wNiNlkp4Wf7ViJQLwg&s=19
आदिवासी नेत्यांची उडी
राज्य सरकारने सरकारने धनगर सामाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नसल्याने आक्रमक झालेल्या नरहरी झिरवाळ यांच्यासह चार जणांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारली. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ते सर्वजण सुखरूप असून, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली नाही
आदिवासी समाजाच्या आरक्षणात अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये, या मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठकीची मागणी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांना 7 तास थांबावे लागले होते. तसेच या नेत्यांची आज मंत्रालयात थोड्या वेळासाठी भेट झाली होती. परंतु या भेटीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने नाराज झालेल्या या नेत्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या घेतल्या.