नायगाव, 27 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवारी (दि.26) निधन झाले होते. त्यानंतर वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते अशोक चव्हाण, भाजपचे अशोक चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांसारखे विविध नेते उपस्थित होते.
https://x.com/girishdmahajan/status/1828353030950973847?s=19
https://x.com/ANI/status/1827898985849208958?s=19
महाराष्ट्राचे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून वसंतराव चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले. वसंतराव चव्हाण यांनी 70 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द
वसंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रमुख आणि एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. वसंतराव चव्हाण यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात नायगावचे सरपंच म्हणून केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. तसेच वसंतराव चव्हाण यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा नायगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. वसंतराव चव्हाण यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते विजयी झाले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.