नाना पटोले यांच्या कारचा अपघात! अपघात की घातपात? याची चौकशी पोलीस करतील, नाना पटोले यांचे विधान

भंडारा, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ही अपघाताची घटना मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. या अपघातात कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नाही. भंडारा शहराजवळील भिलवाडा गावाजवळ हा अपघात झाला. यावेळी मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात नाना पटोले यांच्या कारचे नुकसान झाले आहे.

भिलेवाडा गावाजवळ झाला अपघात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा आटपून त्यांच्या राहत्या गावी सुकळी येथे आपल्या कारमधून परतत होते. यावेळी भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा गावाजवळ महामार्गावरून जात असताना एका ट्रकने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर नाना पटोले यांच्या कार चालकाने कशीतरी गाडी थांबवली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. याप्रकरणी, पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

दरम्यान, या घटनेनंतर नाना पटोले यांनी एक व्हिडिओ जारी केला. या ट्रक ड्रायव्हरने कारला मुद्दाम धडक देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाना पटोले यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. नाना पटोले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. “या अपघातात आम्ही सुखरूप राहिलो पण यामध्ये गाडीचं पूर्णपणे नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी सुरक्षित आहे. कोणी काळजी करू नये. हा अपघात होता कि घातपाताचा प्रयत्न? पोलीस याची चौकशी करतील. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे,” असे नाना पटोले या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

काँग्रेस नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

तत्पूर्वी, या अपघाताच्या घटनेवरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात अतुल लोंढे यांनी ट्विट केले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केला आहे. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,” असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *