पुणे, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते. ही घटना काल पुण्यात घडली होती. नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्राविषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांच्या चेहऱ्याला काळे फासले. पत्रकार भवनासमोर काल 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मोदी सरकार आल्यापासून क्रिकेटचा राजकीय कार्यक्रम झालाय – संजय राऊत
दरम्यान नामदेव जाधव हे एका कार्यक्रमासाठी काल पुण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की करत त्यांच्या चेहऱ्याला काळे फासले. त्यानंतर पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करीत त्यांना गाडीत बसवले. ही घटना कॅमेरात कैद झाली होती. तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांचा अपघाती मृत्यू
तर नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या घटनेची जबाबदारी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वीकारली आहे. “आम्ही नामदेव जाधवच्या तोंडाला काळं फासलं. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा सुपारी घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय आदरणीय पवार साहेबांची बदनामी करणाऱ्या माणसांचा यापुढे पुण्यात असाच पाहुणचार केला जाईल”, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले होते. त्यानंतर नामदेव जाधव यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. “हा लोकशाहीवर हल्ला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मी या प्रकरणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरत नाही. याप्रकरणी शरद पवार आणि रोहित पवार यांना दोषी धरण्यात यावे. त्यांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्यात यावी.” असे नामदेव जाधव यांनी म्हटले होते. तर याप्रकरणी आता पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
One Comment on “नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले; 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल”