नागपूर, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूरमध्ये हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावर नागपूर महानगरपालिकेने आज (दि.24) बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फहीम खानवर नागपूरमध्ये झालेल्या दंगल आणि जाळपोळ प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. अवैध बांधकाम प्रकरणी नागपूर नागपूर महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली होती. या नोटीसची मुदत संपल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
https://x.com/ANI/status/1904043880607318067?t=SKJot2s5hFPVb7nNlo7mbw&s=19
अधिकाऱ्यांनी दिली माहिती
यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेचे उपअभियंता सुनील गजबिये यांनी एएनआय वृत्तसंस्थेला अधिक माहिती दिली आहे. “आम्हाला या प्रकरणात तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश मिळाले होते. आम्ही योग्य ती चौकशी केली आणि त्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 (एमआरटीपी ॲक्ट) मधील कलम 53(1) अंतर्गत 24 तासांची नोटीस बजावली होती. नोटीसचा कालावधी संपताच नियमानुसार कारवाई करण्यात आली.” असे त्यांनी म्हटले आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
फहीम खानच्या अनधिकृत घरावर झालेल्या या कारवाईदरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी सतर्कता घेतली होती. दरम्यान, नागपुरात अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार असून, नियमबाह्य बांधकामे पाडण्याचे काम सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.
33 पोलीस जखमी
दरम्यान, 17 मार्च 2025 रोजी नागपुरात हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी फहीम खान याच्यासह 115 हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसाचाराच्या घटनेमुळे नागपूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. यात काही वाहनांचे नुकसान झाले. तर काही जण जखमी झाले. या घटनेत 33 पोलीस देखील जखमी झाले आहेत, नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी याची माहिती दिली. दरम्यान, नागपूर शहरातील जनजीवन सध्या सामान्य परिस्थिती आहे.
https://x.com/ANI/status/1903788128902566212?t=xEvwF992bp0bYurPhny6VQ&s=19
115 हून अधिक जणांना अटक
नागपूर शहरातील परिस्थिती सध्या सामान्य आहे. आता येथे तसा कोणताही मोठा प्रश्न नाही आणि सर्वत्र जीवन सामान्यपणे सुरू आहे. या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले आहेत. 115 हून अधिक लोक ताब्यात आहेत, आणि पुढील कारवाई सुरू आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. या नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.