मुंबई, 18 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर परिसरात सोमवारी (दि.17) दोन गटात झालेल्या वादानंतर मोठ्या हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.18) विधानसभेत निवेदन सादर केले. अफवा पसरवल्यानंतर ही घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच या घटनेतील दोषींवर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनातून स्पष्ट केले.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1901890877993410657?t=eeSxC1IBoiTntpIYXQPY0w&s=19
मुख्यमंत्र्यांनी सांगितला घटनाक्रम
काल 17 मार्च 2025 रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी औरंगजेबाजी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 299, 37(1)(3) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार दुपारी 3:09 वाजता हा गुन्हा दाखल झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अफवा पसरवल्याने हिंसाचार
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ” यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, “सकाळी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता.” त्यानंतर नमाज आटोपून 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी केली. या लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
12 गाड्यांचे नुकसान
यावेळी हंसापुरी भागात 200 ते 300 लोक दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. त्यावेळी काही गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेत 12 गाड्यांचे नुकसान झाले. तसेच या घटनेत घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी 7:30 वाजता भालदारपुरा परिसरात घडली. त्याठिकाणी 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर करावा लागला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
33 पोलीस जखमी
या घटनेत जमावाने क्रेन आणि दोन जेसीबीसह काही चारचाकी गाड्या जळाल्या आहेत. तसेच या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. ज्यामध्ये डीसीपी स्तरावरील तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या घटनेत एकूण 5 नागरिक जखमी झाले असून, त्यातील तिघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाच गुन्हे दाखल
याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एकूण 3 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या याठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनातून दिली आहे.