नागपूर, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) हलक्या आणि कुरकुरीत पुरीत झणझणीत मसालेदार पाणी, बटाटे व वटाणे यांच्यासोबत मिळणारी पाणीपुरी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. सध्या नागपूरच्या एका पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या अनोख्या ऑफरमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरच्या विजय मेवालाल गुप्ता यांच्या पाणीपुरी स्टॉलवर खास ऑफर्स देण्यात येत असून, त्यात आयुष्यभर अमर्याद पाणीपुरी फक्त 99,000 रुपयांमध्ये मिळण्याची संधी ग्राहकांना दिली जात आहे. यासोबतच ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर्स या पाणीपुरी विक्रेत्याने दिल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1890440044864811214?t=A02CzYZe_B92Hki8IqhMhw&s=19
151 पाणीपुरी खाल्ल्यास 21 हजारांचे बक्षीस
नागपूरच्या विजय मेवालाल गुप्ता यांच्या पाणीपुरी स्टॉलवर खास ऑफर्स देण्यात येत असून, त्यात आयुष्यभर अमर्याद पाणीपुरी फक्त 99 हजार रुपयांमध्ये खाण्याची संधी ग्राहकांना दिली जात आहे. तसेच, 151 पाणीपुरी एकाच वेळी खाल्ल्यास 21 हजार रुपयांचे बक्षीस ग्राहकांना मिळणार आहे.
https://x.com/ANI/status/1890440049642336341?t=HFgzY_T6DhbUiEB-4KZDQQ&s=19
99 हजारात अनलिमिटेड पाणीपुरी!
यासंदर्भात विजय गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्याकडे एक रुपयांपासून ते 99,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत, ज्यात एक दिवसाच्या डीलपासून ते आजीवन प्लॅनपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केली आहे. लोक दरवर्षी पाणीपुरीवर मोठा खर्च करतात. त्यामुळे 99,000 रुपयांमध्ये आजीवन अमर्याद पाणीपुरी ही खूप फायदेशीर योजना आहे. आतापर्यंत दोन लोकांनी ही ऑफर घेतली आहे, असे ते म्हणाले. त्याशिवाय, त्यांनी एक अनोखी ‘महाकुंभ ऑफर’ जाहीर केली असून, यामध्ये 40 पाणीपुरी एकाच वेळी खाल्ल्यास एक पाणीपुरी फक्त 1 रुपयांत मिळते.
विविध प्रकारच्या भन्नाट ऑफर्स
तसेच या पाणीपुरी स्टॉलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सवलत दिली जात असून, त्यांना फक्त 60 रुपयांमध्ये एकावेळी अमर्याद पाणीपुरी खाण्याची संधी मिळणार आहे. तसेच जर तुम्हाला आठवडाभर मोफत पाणीपुरी खायची असेल तर तुम्हाला एका वेळी फक्त 600 रुपये जमा करावे लागतील. तसेच या ऑफरमध्ये महिनाभर पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला 2,000 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला वर्षभर पाणीपुरी खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 5000 रुपये जमा करावे लागणार आहेत. जर तुम्हाला दररोज पाणीपुरी खायची असेल तर या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 95 रुपयांमध्ये अमर्यादित पाणीपुरी खायला मिळणार आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ
विजय यांच्या या भन्नाट ऑफर्समुळे त्यांचा व्यवसाय वेगाने वाढला असून, सोशल मीडियावरही त्यांचा पाणीपुरी स्टॉल चर्चेत आहे. या ऑफर्समुळे विजय गुप्ता यांचा पाणीपुरी स्टॉल प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. विजय गुप्ता यांचे हे बिझनेस मॉडेल ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कल्पकता कोणत्याही व्यवसायाला यश मिळवून देऊ शकते, हे यावरून सिद्ध होत आहे.