नागपूर, 17 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये वाद झाल्याने तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.17) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत काही लोकांनी वाहनांची तोडफोड केली असून, काही वाहनांना आग लावण्यात आली आहे. तसेच, दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. तर यामध्ये खुद्द नागपूरचे पोलीस उप आयुक्त अर्जित चांडक यांच्या पायाला देखील किरकोळ दुखापत झाली आहे.
https://x.com/ANI/status/1901659308389191710?t=3YNlVBKkzKO5oOiAHVQFMA&s=19
पोलिसांकडून अश्रुधूराचा वापर
या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूराचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.
https://x.com/ANI/status/1901666249404473718?t=ku2bkX6E4b_y-yeWXUQQNg&s=19
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
या घटनेबाबत डीसीपी अर्चित चांडक यांनी सांगितले की, “ही घटना काही गैरसमजामुळे घडली आहे. परिस्थिती आत्ता नियंत्रणात आहे. आमचे पोलीस पथक येथे तैनात आहे. कृपया कोणीही घराबाहेर पडू नये किंवा दगडफेक करू नये. काही वाहनांना आग लावण्यात आली होती, परंतु अग्निशमन दलाच्या मदतीने ती आग विझवण्यात आली. आम्ही कठोर कारवाई करत आहोत.”
https://x.com/ANI/status/1901669416745750645?t=AEsgDW146G6feWtgYxvxYg&s=19
अग्निशमन दलाचे जवान जखमी
तसेच यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या हिंसाचारात दोन जेसीबी वाहनांना आग लावण्यात आली, त्याचबरोबर आणखी काही वाहने जाळली गेली आहेत.” तर या दगडफेकीच्या घटनेत एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
परिस्थिती नियंत्रणात
नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींदर सिंगल यांनी येथील हिंसाचाराबाबत सांगितले की, सध्या परिस्थिती शांत आहे. एका फोटोची जाळपोळ केल्यानंतर काही नागरिकांनी यावर आक्षेप घेतला आणि आम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे कारवाई केली. त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. रात्री आठ साडेआठच्या सुमारास ही हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी काही लोकांनी वाहनांना आग लावली तसेच त्यांनी दगडफेक केली. जास्त गाड्या जळाल्या नाहीत. सध्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. दोन गाड्या जळाल्या आणि दगडफेक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दरम्यान, पोलीस शोध मोहीम राबवत असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अनावश्यक घराबाहेर पडू नये. तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.