नागपूर, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर शहरात 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर आता परिस्थिती सामान्य होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील आणखी आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांची 10 पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे या हिंसाचारप्रकरणी आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
https://x.com/ANI/status/1902234593660399790?t=bpW_L8ad6nqu0k-AMW2EFw&s=19
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
नागपूरचे डीसीपी राहुल माकणीकर यांनी सांगितले की, “सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 10 तपास पथके स्थापन केली असून, आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.”
महिला पोलिसांवरील गैरवर्तनाचा आरोप
दरम्यान, या हिंसाचारादरम्यान काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, एका आरोपीने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशाला आणि शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. तसेच, काही महिला पोलिसांसोबत अश्लील हावभाव करून गैरवर्तन करण्यात आल्याचे नमूद आहे.
संचारबंदी लागू
या हिंसाचारानंतर नागपूर शहरातील 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशीही ती कायम आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी नागपूर पोलीस आणि सुरक्षा दलाने शहराच्या विविध भागांत फ्लॅग मार्च काढला.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, हिंसाचारात सामील असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये आणि त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.