नागपूर, 10 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर येथे भरधाव वेगातील एका ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताला कारणीभूत असलेली ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या कारमध्ये संकेत बावनकुळे हा देखील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. या अपघात प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापल्याचे पहायला मिळत आहे.
https://x.com/cbawankule/status/1833138891731378512?s=19
बावनकुळे काय म्हणाले?
या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुलाच्या नावावर ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. पोलीस चौकशीत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. कोणालाही वेगळा न्याय लावू नये. सर्वांसाठी एकच न्याय असला पाहिजे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
https://x.com/ANI/status/1833384881247920136?s=19
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान, नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली होती. या अपघातात ह्या ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झाले असून कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे. याप्रकरणी, नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी कारचा चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेला रोनित चित्तमवार यांच्याविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला. या अपघातावेळी गाडीत अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांच्यासह संकेत बावनकुळे देखील होता. पोलिसांनी यावेळी त्यांचे वैद्यकीय नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. या चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले आहे. तर कोर्टाने कार चालक अर्जुन हावरेला जामीन मंजूर केला आहे.