चीनमधील गूढ आजार भारतात आला नाही; भारत सरकारचे स्पष्टीकरण

हैदराबाद, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तेथे इन्फ्लूएंझा ए विषाणूचा उप-प्रकार H9N2 (न्यूमोनिया) आणि श्वसनाच्या आजाराने थैमान घातले आहे. हा आजार लहान मुलांना होत असल्याचे आढळून आले आहे. चीननंतर आता भारतातही या आजाराची 7 प्रकरणे समोर आल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात या आजाराचे 7 रुग्ण आढळले असल्याचे या बातमीत म्हटले होते. मात्र, यासंदर्भात भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. ही बातमी खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत भारत सरकारने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1732664924151972163?s=19

“दिल्लीतील एम्स रुग्णालयात आढळलेल्या न्यूमोनियाच्या प्रकरणांचा चीनमध्ये पसरलेल्या संसर्गाशी काहीचं संबंध नाही, असे भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दावा करणारे मीडिया रिपोर्ट्स दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत. देशातील संसर्गाशी संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नाही. दिल्लीतील एम्स रुग्णालयात न्यूमोनिया प्रकरणांचा चीनमधील मुलांमध्ये श्वसन संक्रमणाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही. तसेच येथील सर्व रुग्ण साध्या न्यूमोनियाचे आहेत.” असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.



दरम्यान, काही प्रसारमाध्यमांनी एम्स रुग्णालयात चीनमधील गूढ आजाराचे 7 रुग्ण आढळले असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने हे निवेदन प्रसिद्ध करीत लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने एम्स रुग्णालयात आतापर्यंत विविध श्वसन आजारांच्या 611 रुग्णांची चाचणी केली होती. यामध्ये एकाही रुग्णाला न्यूमोनिया आढळून आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *