म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी भारताचा मदतीचा हात

म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी भारताचा मदतीचा हात

दिल्ली, 30 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारताचे आणखी एक सी-130 विमान शनिवारी (दि.29) म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथे उतरले. या विमानातून 38 एनडीआरएफ जवान आणि 10 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली.

https://x.com/MEAIndia/status/1906032565934543260?t=pA94Mt6ETqTzZ8nfU_vbtg&s=19

https://x.com/MEAIndia/status/1906044871795958207?t=UjoyDiuUV615QAWHOvSjJQ&s=19

भारताकडून तिसऱ्यांदा मदत

“म्यानमारमध्ये मदत पोहोचवणारे हे तिसरे भारतीय विमान आहे. यात एनडीआरएफच्या 38 कर्मचाऱ्यांसह 10 टन आवश्यक साहित्य पाठवण्यात आले आहे.” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच दोन मोठ्या सी-17 विमानांमधून भारतीय लष्कराचे डॉक्टर आणि मदतनीस असे एकूण 118 लोक म्यानमारला गेले आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलांची आणि महिलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि इतर 60 टन मदत सामग्री ज्यामध्ये औषधे आणि अन्न यांचा समावेश आहे. आज भारताकडून म्यानमारला मदतीसाठी एकूण 5 विमाने गेली आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

थायलंडमध्येही भूकंपाचे धक्के

दरम्यान, या भूकंपाचा प्रभाव म्यानमारव्यतिरिक्त थायलंडमध्येही जाणवला. तसेच, चीन आणि भारताच्या काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केले आहे.

https://x.com/narendramodi/status/1905534514505678980?t=A9Ox9ajfJ8yLOQ0zh6vP8Q&s=19

पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाइंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोदींनी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत भारत म्यानमारच्या नागरिकांसोबत आहे, असे सांगितले. पंतप्रधान मोदींनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल मी चिंतेत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे.”

1 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी

दरम्यान, शुक्रवारी (दि.28) दुपारी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. सागाईंग भागात झालेल्या या भूकंपानंतर 2.8 ते 7.5 तीव्रतेचे अनेक मोठे धक्के जाणवले. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. म्यानमारच्या राज्य प्रशासन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात 1,000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, 2,376 जण जखमी झाले आणि 30 लोक बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *