मुंबई, 03 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार प्रसाद लाड यांना विधिमंडळ सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी केली होती. त्यानंतर अंबादास दानवे यांनी आज उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून निलंबनाच्या कारवाई संदर्भात फेरविचार करण्याची विनंती केली आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत उपसभापती काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पत्रात काय म्हटले?
दरम्यान, अंबादास दानवे यांनी त्यांच्या पत्रात झालेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. दि. 1 जुलै रोजी विधानपरिषद सभागृहात झालेल्या घटनेनंतर मला दिनांक 2 जुलै रोजी आपण 5 दिवसांसाठी निलंबित केले. महोदया, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा व परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक 1 जुलै 2024 रोजी माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे. हे आपण जाणताच आणि माझीही भुमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतू नाही, असे अंबादास दानवे यांनी या पत्रात म्हटले आहे.
निलंबनाचा फेरविचार करावा…
तसेच सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरूण व माता-भगिणींचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरून सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरूण व माता-भगिणींचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये. या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी या पत्राच्या माध्यमातून त्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती उपसभापतींकडे केली आहे.