महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण लागू करावे, बारामतीतील मुस्लिम समाजाची मागणी

बारामती, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण लागू करावे, अशी मागणी बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलचे बारामती प्रदेश सरचिटणीस सोहेल शेख यांनी केली आहे. तत्पूर्वी, बारामती शहरातील जळोची येथील आयेशा मस्जिद याठिकाणी मुस्लिम समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. या बैठकीतून राज्यात मुस्लिम आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. “मुस्लिम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेले शिक्षणातील 5 टक्क्यांचे आरक्षण महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप लागू केलेले नाही. इतर राज्यांमध्ये हे आरक्षण मिळते, मग महाराष्ट्रातच का नाही?” असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अभियंता सेल सरचिटणीस सोहेल शेख यांनी केला आहे.



या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते सारंग यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले. “शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाज आर्थिक कारणांमुळे अजूनही मागासलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील 75 टक्के मुले शाळेच्या पहिल्या काही वर्षातच शिक्षणापासून वंचित राहतात. केवळ दोन ते तीन टक्के मुले उच्च शिक्षण घेतात. दारिद्र्यरेषेखाली देखील मुस्लिमांचे प्रमाणही अधिक आहे. सरकारी नोकऱ्या, तसेच खासगी नोकऱ्यांतही प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे. अशिक्षित, बेरोजगार मुस्लिम तरूणांमध्ये व्यसनाधीनता वाढते. या सर्वांचे मूळ हे शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय मुस्लिम समाजाचा उद्धार होणार नाही, ही वस्तूस्थिती आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते सारंग यांनी म्हटले आहे.

आरक्षण लागू करण्याची मागणी

महाराष्ट्रात कोणाचेही सरकार आले तरी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही. तसेच न्यायालयानेच मंजूर केलेले हे आरक्षण सरकार लागू करत नाही, हे संतापजनक आहे. प्रत्येक पक्ष फक्त निवडणुकीत मत मिळवण्यासाठी मुसलमानांचा वापर करताना दिसतो. पण मुसलमानांच्या हक्कासाठी कोणीही लढताना दिसत नाही. चंद्राबाबू नायडू यांनी मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण अबाधित ठेवत ही भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होत आहेत. मग महाराष्ट्र सरकारला याबाबत काय अडचण असावी? असा सवाल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुस्लिम समाजाचा आंदोलनाचा इशारा

दरम्यान बारामती मुस्लिम समाजाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रातून बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. “येत्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण लागू करावे, अन्यथा मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार,” असा इशारा बारामती मुस्लिम समाजाने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *