पुणे, 25 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप खासदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर डेक्कन येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
https://twitter.com/SidShirole/status/1783471974175662173?s=19
https://twitter.com/mohol_murlidhar/status/1783508692400226735?s=19
मुरलीधर मोहोळ यांची रॅली
तत्पूर्वी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डेक्कन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गे रॅली काढली. त्यांच्या या रॅलीत महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुण्यात तिरंगी लढत
पुणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. पुणे मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली होती. त्यामुळे पुण्याचा गड यंदाही भाजप राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.