मुंबई, 08 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील माहीम परिसरातील एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या प्रियकराला जबाबदार धरले आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या मृत तरूणीच्या प्रियकराला अटक केली असून सध्या त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. या संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1887799989222678794?t=5IWKzCFniCLJobjgajC9ig&s=19
तरूणीने व्हिडिओ बनवला
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरूणीने या व्हिडिओत आपल्या प्रियकरावर दोन वेळा गर्भवती केल्यानंतर जबाबदारी नाकारल्याचा तसेच लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. तिने यामध्ये सांगितले की, प्रियकराने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केले. या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गुन्ह्याची नोंद
या प्रकरणी पोलिसांनी या तरूणीच्या प्रियकराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे. अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. पोलीस सध्या या तरूणीचा मोबाईल तपासत आहेत. यातून तिच्या प्रियकराशी असलेल्या नात्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, या निर्णयासाठी तिच्यावर इतर कोणी दबाव आणला होता का? याचाही तपास सध्या सुरू आहे.