मुंबई, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परदेशातून मुंबईत आलेल्या 55 वर्षीय महिलेची पर्स गहाळ झाली होती. या पर्सचा मुंबई पोलिसांनी शोध लावून, ती पर्स सबंधित महिलेला परत दिली आहे. या पर्समध्ये 2200 डॉलर्स आणि 135 दिरहम असा एकूण 1 लाख 87 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल होता. ही महिला अदिस अबाबा येथून मुंबईत आली होती. त्यावेळी या महिलेची ही पर्स मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गहाळ झाली होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच या महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1737841719985733872?s=19
त्यानंतर पोलिसांनी तिच्या पर्सचा शोध घेण्यास सुरूवात केली. या तपासादरम्यान विमानतळ कर्मचाऱ्यांना ही पर्स सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी या महिलेची पर्स पोलिस ठाण्यात जमा केली. त्यानंतर पोलिसांनी सबंधित महिलेचा शोध घेतला. त्यावेळी ही पर्स या महिलेचीच आहे की नाही? याची पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची पर्स तिच्या स्वाधीन केली.
पोलिसांनी तिच्या पर्सचा शोध लावल्यामुळे या महिलेने आनंद व्यक्त केला आहे. तसेच तिने यावेळी पोलिसांचे आभार मानले. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. दरम्यान, प्रवास करताना अनेकदा लोकांचे पाकीट किंवा अन्य वस्तू गहाळ होत असतात. मात्र, यांतील बहुतांश वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही ह्या वस्तू पुन्हा सापडत नसल्याने लोकांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांनी प्रवास करताना आपल्या वस्तूंची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.