मुंबई, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दक्षिण मुंबईतील ससून डॉकजवळ समुद्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बुधवारी (दि.05) ही माहिती दिली. मृतदेह तरंगत असल्याची माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1887212264950002014?t=6bXaxOPLYxig3ctSQxeyuw&s=19
मृत व्यक्तीची ओळख पटली नाही
प्राथमिक तपासानुसार, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. कुलाबा पोलिसांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. “मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुढील तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
ससून डॉक आणि आजूबाजूच्या भागात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत व्यक्तीने आत्महत्या केली आहे की हा घातपाताचा प्रकार आहे? याची चौकशी सध्या केली जात आहे. तसेच, मृत व्यक्ती हरवलेल्या कोणत्या तक्रारींशी संबंधित आहे का? हे शोधण्यासाठी पोलीस विविध पोलीस ठाण्यांत माहिती घेत आहेत.
पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत, जेणेकरून घटनेच्या पार्श्वभूमीबाबत काही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतील. तसेच, स्थानिक मच्छीमार आणि रहिवाशांकडून देखील माहिती घेतली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.