मुंबई, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) ने ऑटो रिक्षा, काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि एसी कूल कॅब्सच्या तिकिटांमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक खर्चाचा भार सोसावा लागणार आहे. ही भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, दीड किलोमीटर अंतरावर ऑटो रिक्षांच्या प्रारंभिक भाड्यात 3 रुपयांची वाढ झाली आहे.
https://x.com/airnews_mumbai/status/1882792746169344177?t=HOjxWrsyTKEcbERHVmNsTw&s=19
किती भाडेवाढ?
त्यामुळे ऑटो रिक्षाचे भाडे आता 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले आहे. तसेच, काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात देखील 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्याचे प्रारंभिक भाडे आता 28 रुपयांवरून 31 रुपये झाले आहे. याशिवाय, एसी कूल कॅब्सच्या भाड्यात 8 रुपयांची वाढ केली गेली आहे. त्यानुसार, एसी कूल कॅब्सचे पहिल्या दीड किलोमीटरसाठी भाडे 40 रुपयांवरून थेट 48 रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.
1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी
या नवीन दरांची अंमलबजावणी त्वरित होणार नाही. येत्या 1 फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. पण दरम्यानच्या काळात वाहनचालकांनी जुनेच दर आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सामान्य प्रवाशांना आधीच महागाईचा ताण सहन करावा लागत असताना ही भाडेवाढ त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकते.
सर्वसामान्यांना फटका
मात्र, वाहनचालक संघटनांनी इंधनाच्या वाढत्या किमती, देखभालीचा खर्च आणि महागाई यामुळे ही दरवाढ आवश्यक असल्याचे मत मांडले आहे. या वाढीव भाडेवाढीमुळे वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल, तर दुसरीकडे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय त्यांच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. ही भाडेवाढ महागाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे की नाही? यावर चर्चा सुरू असली तरी या निर्णयाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे या दरवाढीकडे प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.