मुंबई, 27 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई पोलिसांनी 17 बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या राहिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हे सर्वजण भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आता अटक करण्यात आली आहे. मुंबईतील शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी ही कारवाई केली असून, सध्या पुढील तपास सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1905113972321460582?t=KBDuFtyKXYQVFKm2fQT8wg&s=19
मुंबई पोलिसांची धडक कारवाई
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून आठ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात पासपोर्ट नियम 1950 आणि विदेशी नागरिक कायदा 1946 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील आरसीएफ पोलिसांनीही अशाच प्रकारची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. चौकशीनंतर हे सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व परदेशी नागरिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, ते भारतात किती काळापासून होते? आणि कोणत्या कारणांसाठी आले होते? याचा तपास सुरू आहे.
बनावट आधार कार्डांची तपासणी
चौकशीदरम्यान, संशयास्पद आधार कार्डांची पुनर्परीक्षणासाठी पाठवणी करण्यात आली आहे. आधार नोंदणी केंद्रांना सूचित करण्यात आले आहे की, जर त्यांना कोणत्याही संशयास्पद दस्तऐवजांच्या आधारे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न दिसला, तर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे. जर एखाद्या व्यक्तीचे बांगलादेशी नागरिक असल्याचे निश्चित झाले, तर त्यांना तात्पुरत्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल आणि परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय यांना माहिती देऊन त्यांना प्रोटोकॉलनुसार सुरक्षित मायदेशी पाठवण्यात येईल.
गृहमंत्रालयाची चौकशीची सूचना
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने अलीकडेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणांची एकत्रित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणांची एकत्रितपणे चौकशी करण्याचे आणि बेकायदेशीरपणे आधार कार्ड व इतर भारतीय नागरिकत्वाचे कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये ही बनावट कागदपत्रे प्रवासासाठी वापरले जात असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः युरोपियन देश आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाण्यासाठी ही कागदपत्रे तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.