सध्या राज्यात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम हा कोळसा टंचाईवर होताना दिसत आहे. यामुळे विजेच्या पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य शासन आणि महावितरणने
वीज चोरांविरोधात राज्यभर धडक कारवाई सुरु केली आहे. यात बारामती परिमंडलाने तब्बल 6201 आकडे बहाद्दरांवर कारवाई केली आहे.
तालुक्यात ज्या फिडरवरील लोड हा 100 ॲम्पीअरपेक्षा जास्त आहे, अशा तब्बल 489 फिडरवरील अनाधिकृत आकडे, मंजूर क्षमतेपेक्षा जास्त असलेला वापर काढण्यात आलेला आहे. दरम्यान, 20 एप्रिलला या फिडरवरील भार हा 1728 मेगावॅट होता, 25 एप्रिल रोजी कारवाई अंती तो 1554 मेगावॅटवर आला आहे. या धडक कारवाईमुळे यंत्रणेवरील तब्बल 174 मेगावॅटचा ताण वाचला आहे. यामुळे 489 पैकी 126 फिडरचा भार 10 टक्क्यांनी कमी झाला आहे.
या धडक कारवाईत वीज कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या टाकलेले केबल, स्टार्टर जप्त करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी त्यांनी टाकलेले आकडे स्वतःहून काढून टाकले. यामुळे अतिरिक्त भार झपाट्याने कमी होण्यास मदत झाली. यापुढेही तालुक्यात महावितरणाची धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.