पुणे, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा पेपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दीपक दयाराम गयाधाणे (26) आणि सुमित कैलास जाधव (23) आणि सुरेंद्र वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासात या आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. याबाबतची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
40 लाखांना प्रश्नपत्रिका विक्रीचा डाव
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी (दि.02) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी या आरोपींनी विद्यार्थ्यांना 40 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबतची माहिती पोलिसांना 30 जानेवारीला मिळाली होती. यासंदर्भात काही तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. तसेच काही वृत्तपत्रांमध्येही अशा प्रकारच्या कॉल्सबद्दल माहिती प्रसिद्ध झाली होती. अज्ञात क्रमांकांवरून काही लोक विद्यार्थ्यांना कॉल करून प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवत होते, असे पुणे क्राईम ब्रँचचे उपायुक्त निखिल पांगळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना गंडवण्याचा प्रयत्न
या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दीपक दयाराम गयाधाणे आणि सुमित कैलास जाधव या आरोपींना चाकण येथील महाळुंगे एमआयडीसी परिसरातून अटक केली. तसेच तपासादरम्यान भंडाऱ्यातून योगेश सुरेंद्र वाघमारे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आले की, या आरोपींना 24 उमेदवारांची यादी भंडाऱ्यातील योगेश वाघमारे याने पुरवली होती. याची माहिती मिळताच नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने वाघमारेलाही अटक करण्यात आली. वाघमारेकडे ही यादी कशी आली? आणि आणखी कोण या प्रकरणात सामील आहे का? याचा तपास सध्या सुरू आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
दरम्यान, पोलीस उपायुक्त निखिल पांगळे यांनी स्पष्ट केले की, आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात कोणत्याही विषयाचा पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. सध्या त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या तक्रारीवरून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अयोग्य वर्तन प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.