बोपदेव घाट लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुण्यात आंदोलन

पुणे, 08 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील बोपदेव घाटात एका तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि.08) पुण्यातील अलका चाैक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. तसेच त्यांनी यावेळी राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

https://x.com/supriya_sule/status/1843580491674316991?t=i-C7oFlvx9xFc9msKLH1LQ&s=19

सुप्रिया सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

हे महायुती सरकार महिला सुरक्षेबरोबरच पोलिसांचे देखील मनोबल खच्ची करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बोपदेव घाटात बलात्कार करणारे नराधम आजही मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्यांना अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असून, येत्या दोन दिवसात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर देखील आंदोलन करण्याचा इशारा ही सुप्रिया सुळे यावेळी दिला.

सरकारच्या राजीनाम्याची मागणी

तसेच राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत असतानाही राज्यातील सरकार मोठे मोठे कंत्राट संमत करत आहे. आज राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हे सरकार महिला सुरक्षेबरोबरच आर्थिक आघाडीवरही अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच राज्यातील आर्थिक स्थितीवर महायुतीतील कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आज महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे अपयशी ठरलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस नेते रमेश बागवे, काँग्रेस नेते मोहन जोशी, स्वाती पोकळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *