मुंबई, 08 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील 288 मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात 15 ऑक्टोंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान, पोलिसांनी मुंबईतील काळबादेवी परिसरात 2 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या जप्त करण्यात आलेल्या रकमेची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या 12 जणांची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे.
https://x.com/ANI/status/1854734836856139942?t=sIWL400n_HP8IudtcOsNhw&s=19
2.3 कोटी रुपयांची रक्कम जप्त
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.08) ही माहिती दिली. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी (दि.07) रात्री काही लोकांना अडवले. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. यावेळी हे लोक या रोख रकमेशी संबंधित कोणतेही कागदपत्र सादर करू शकले नाहीत. तसेच एवढी मोठी रक्कम का घेऊन जात आहेत? याचे कारण देखील ते सांगू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडील 2.3 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. या रक्कमेचा सध्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे.
280 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त
दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात आतापर्यंत महाराष्ट्रात 280 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 73.11 कोटी रुपयांची रोख रक्कम, 37.98 कोटी रुपयांची दारू, 37.76 कोटी रुपयांची औषधे, 90.53 रुपयांचे मौल्यवान धातू आणि 42.55 कोटी रुपयांच्या भेटवस्तू यांचा समावेश आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.