अहमदाबाद, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळता येणार नाही. यासंदर्भातील बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आज पीटीआयला सांगितले. तर आता मोहम्मद शमीच्या घोट्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या आधीच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1760594346565423600?s=19
विश्वचषक सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या
दरम्यान, 33 वर्षीय मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तो ऑक्टोबर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर एकही सामना खेळलेला नाही. या स्पर्धेत मोहम्मद शमीने 7 सामन्यात सर्वाधिक 24 बळी घेतले होते. तसेच तो विश्वचषकात 50 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. तत्पूर्वी, मोहम्मद शमीने गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. त्याने 17 सामन्यात सर्वाधिक 28 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीला अलीकडेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर
याच दुखापतीमुळे मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील खेळता आले नाही. तो भारताकडून अखेरचा सामना नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये खेळला होता. दरम्यान, “मोहम्मद शमी शेवटच्या आठवड्यात लंडनला गेला होता. जिथे त्याने घोट्यासाठी खास इंजेक्शन घेतले. डॉक्टरांनी त्याला सांगितले की तो 3 आठवड्यांनंतर धावू शकतो. जर त्याला बरे वाटले तर तो गोलंदाजी सुरू करू शकतो,” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.