निपाणी, 02 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशाच एका सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर करून हा देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न या देशाचे प्रधानमंत्री व त्यांचे सर्व सहकारी करत असल्याचा आरोप शरद पवारांनी या सभेतून केला. ते बेळगावच्या निपाणी येथे आयोजित इंडिया आघाडीच्या विजय संकल्प सभेत बोलत होते.
आश्वासनांची पूर्तता केली नाही
आज या देशाची सूत्र नरेंद्र मोदींच्या हातात आहेत. ते तुमच्या व शेजारच्या राज्यात येऊन गेले असतील. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अनेक आश्वासने दिली, अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्यातील एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. असे शरद पवार यावेळी म्हणाले. लोकशाही संकटात येईल अशा प्रकारचे पाऊल मोदी टाकत आहेत. सत्तेचा गैरवापर करून हा देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न या देशाचे प्रधानमंत्री व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायची मोदींची गॅरंटी आहे? सामान्य माणसाला संकटात आणायचं, ही मोदींची गॅरंटी आहे? असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केला.
भाषणात फक्त विरोधकांवर टिका
आज नरेंद्र ही भाषा करतात आणि त्यांच्या हातात पुन्हा देशाचा कारभार दिला, तर आपण सगळेजण संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांचा, शेतकऱ्यांचा सन्मान नाही. शेतीमालाच्या किंमती हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या आत्महत्यांचं कारण त्यांच्या घामाची किंमत त्यांना मिळत नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही पण मोदी या सगळ्यांकडे ढुंकून बघायला तयार नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हातात राज्य गेल्यानंतर त्यांनी लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले व राबवले नुसती घोषणा केली नाही. मोदींच्या राजवटीमध्ये एकही निर्णय राबवला जात नाही. फक्त भाषणं केली जातात आणि त्या भाषणांमध्ये विरोधकांवर टिका-टिप्पणी केली जाते, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.