मुंबई, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुले आव्हान दिले दिले होते. “मी शरद पवार यांना आव्हान देतो, राहुल गांधी यांना असे विधान करायला लावा की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत,” असे नरेंद्र मोदी या सभेत म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत हे वक्तव्य केले होते. त्यावरून शरद पवारांनी आज नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले आहे. यासंदर्भात इंडिया आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार माध्यमांशी बोलत होते.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1791694369634062487?s=19
https://twitter.com/NCPspeaks/status/1791753897796919795?s=19
शरद पवार काय म्हणाले?
“आजच्या निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये वीर सावरकर हा विषयच नाही. राहुल गांधी यांनी त्यासंबंधी कुठलंही भाष्य केलेलं नाही. कारण नसताना एक प्रकारचं चेतावणी देण्याचं काम हे मोदी करत आहेत,” असे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच मोदींचं कालचं सबंध भाषण जाणीवपूर्वक धर्मांध प्रवृत्ती कशी वाढेल, हे सूत्र नजरेसमोर ठेवून केलेलं आहे. आज सामाजिक ऐक्य हा जो विषय आहे, तो देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी त्या संदर्भात तारतम्य दाखवण्याची आवश्यकता आहे. दुर्दैव आहे की, हे पहिले प्रधानमंत्री आहेत की ते या संबंधी तारतम्य दाखवत नाहीत आणि सामाजिक, धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन देत नाहीत, असे शरद पवार यावेळी म्हणाले. या देशातील सर्व धार्मिक स्थळांचा आदर करणे हे आपले कर्तव्य असेल, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, पारशी असो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीचे विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.