महिला दिनानिमित्त मोदी सरकारची भेट! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात

19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर

नवी दिल्ली, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त आज मोठी घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त देशातील महिलांना मोठी भेट देत 14.2 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमती 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. यासंदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून केली आहे. याचा फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

नरेंद्र मोदी यांचे ट्विट

“आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कपात केली होती

तत्पूर्वी, केंद्र सरकारने 30 ऑगस्ट 2023 रोजी 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर देशातील घरगुती गॅसच्या किंमती आतपर्यंत स्थिर होत्या. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नव्हती. तर केंद्र सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आता गॅस इतक्या रुपयांना मिळणार

या दर कपातीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 903 रुपयांवरून 803 रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये याची किंमत 929 रुपयांवरून 829 रुपये झाली आहे. तर मुंबईत याच्या आधी घरगुती गॅस सिलिंडर 902.50 रुपयांना मिळत होते, ते आता 802.50 रुपये किमतीला झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *