इयत्ता दहावीच्या संदिग्ध प्रश्नाला अतिरिक्त गुण द्यावे, आमदार कपिल पाटील यांची मागणी

मुंबई, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला एक पत्र लिहिले आहे. इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तरांना अतिरिक्त गुण देण्यात यावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या संदिग्ध प्रश्नाच्या उत्तरांना अतिरिक्त गुण मिळणार का? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/KapilHPatil/status/1770411692700348502?s=19

कपिल पाटील यांनी पत्रात काय म्हटले?

दिनांक 18 मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान 1 या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न 1 (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत माझ्याकडे चिंता व्यक्त केली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर ‘हेलियम’ असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

उत्तराबाबत खुलासा करावा

या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता, या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा, ही विनंती. धन्यवाद! असे कपिल पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *