मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जगभरात ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) चा प्रभाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि.07) मंत्रालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी एचएमपीव्ही आजाराबाबत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. मात्र, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
https://x.com/ANI/status/1876566896562274811?t=Z_lmMGj31DpiyDO6dapJ6w&s=19
हसन मुश्रीफ यांनी काय सांगितले?
याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, काही राज्यांमध्ये एचएमपीव्हीचे प्रकरणे आढळली असली तरी महाराष्ट्रात सरकार तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास तयार आहे. लवकरच या विषाणूसंदर्भात सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
आरोग्य विभागाने सतर्क राहावे
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि गरज भासल्यास विलगीकरणाची सोय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, औषधांसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ केले आहे.
https://x.com/mrhasanmushrif/status/1876559303336657041?t=Zp30UjKjKP8hnjU4aDsRwg&s=19
काळजी घेण्याचे आवाहन
आरोग्य विभागाने नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाकण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुण्याचे महत्त्व सांगितले आहे. ताप, खोकला, शिंका किंवा सर्दीची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावी, भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेषतः संशयित रुग्णांपासून दूर राहून आणि संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी सतर्कता बाळगावी, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. योग्य काळजी घेतल्याने या रोगाचा प्रसार कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.