मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया

धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया मुंबईतील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांच्या खाजगी रुग्णालयात पार पडली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे हे सध्या कोणालाही भेटू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांनी बुधवारी (दि.05) सोशल मीडियावरून दिली. तर सोशल मीडियावर त्यांना लवकर बरे वाटण्यासाठी शुभेच्छा देणारे अनेक संदेश येत आहेत.

https://x.com/dhananjay_munde/status/1886763148360999308?t=_jBVB-hX8ENQl5osPmrsfw&s=19

धनंजय मुंडेंची सोशल मीडियावर पोस्ट

मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहतील, मात्र ते 10 फेब्रुवारीपासून पुन्हा नियमित कामकाज सुरू करतील. “माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल”, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी या पोस्टमधून दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तर धनंजय मुंडे यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत अंजली दमानिया यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *