मुंबई, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले आहे. याची माहिती आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून दिली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, आदिती तटकरे यांचे फेसबूक अकाऊंट हॅक केल्यानंतर या हॅकरने त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.
https://x.com/iAditiTatkare/status/1846849494249324712?t=4NQwWnvi0nLwLchjmrs2LQ&s=19
आदिती तटकरे यांनी काय म्हटले?
“नमस्कार, माझे फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून, त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून, लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व!” असे आदिती तटकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एखाद्या मंत्र्याचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषीचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ!
सध्याचा काळात हॅकिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अलीकडच्या काळात अशी प्रकरणे वेगाने वाढली आहेत. यामध्ये अनेक नेते, सेलिब्रिटी यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचे आपण पाहिलेले आहे. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट देखील हॅक झाले होते. अशा घटनांमुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नये आणि त्यांनी टू फॅक्टर व्हेरिफिकेशन सेटिंग चालू करावी.