सिल्लोड, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे गौतमी पाटील हिच्या डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी तरूणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरूणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ही परिस्थिती पाहून हा कार्यक्रम मध्येच बंद करावा लागला.
https://x.com/Satisdaud0705/status/1742760226909253669?s=20
त्यावेळी मंत्री अब्दुल सत्तार हे या तरूणांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी स्टेजवर जाऊन माईक हातात घेतला आणि पोलिसांना या तरूणांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या तरूणांना शिवीगाळ केली. सोबतच त्यांनी अश्लील भाषेचा वापर केला. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकजण अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करीत आहेत. तर या प्रकरणामुळे मंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1742761408759320964?s=19
विजय वडेट्टीवार यांची टीका
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. “महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.