अजित पवारांकडून रडण्याची नक्कल; रोहित पवारांचे प्रत्यूत्तर!

बारामती, 06 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी रविवारी (दि.05) शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी भोर, वेल्हे, वरवंड, इंदापूर आणि बारामती या 5 ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या. यामध्ये बारामती येथील प्रचार सांगता सभेतून अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली. मी तुम्हाला सांगितलं होतं की, “शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या,” असे बोलून अजित पवारांनी डोळ्यांना रुमाल लावला.

किस्सा सांगताना भावूक

तत्पूर्वी, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी बारामती येथे प्रचार सांगता सभा पार पडली. या सभेत बोलताना आमदार रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “मी आणि आमचे कार्यकर्ते जेव्हा साहेबांसोबत बसलो होतो. तेव्हा पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं, काही काळजी करू नका. आपल्याला स्वभिमानी महाराष्ट्रासाठी नवी पिढी तयार करायची आहे. तोपर्यंत नवी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही,” हे सांगताना रोहित पवार यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

रोहित पवार काय म्हणाले?

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. “अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा आणि हो वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही,” असे रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *