मुंबई, 03 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 35 भाव देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर 30 रुपये भाव आणि राज्य सरकारकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये भाव मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सादर केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1808142519026569538?s=19
1 जुलैपासून दरवाढ लागू
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाले होते. याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला प्रतिलिटर 35 रुपयांचा भाव देण्याचा निर्णय घेतला. ही नवीन दरवाढ 1 जुलैपासून लागू होणार आहे. याची माहिती देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
https://x.com/RVikhePatil/status/1808403326519677097?s=19
मंत्रालयात बैठक
दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दूध भुकटी प्रकल्प प्रतिनिधी यांची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार आयुक्त प्रशांत मोहोड, तसेच राज्यातील दूध भुकटी प्रकल्पातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील यांनी दूध भुकटी प्रकल्पातील प्रतिनिधींच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
भुकटी निर्यात करणाऱ्या दूध प्रकल्पांना अनुदान
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरची मागणी कमी झाली आहे. परिणामी दूध पावडर आणि बटर यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलो साठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनासाठी असणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.