मुंबई, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातात भगवा झेंडा दिला. देवरा यांनी आज सकाळी ट्विट करून आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, त्यांच्या शिंदे गटात जाण्याने काँग्रेस सह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1746470692101734487?s=19
राजकीय प्रवासातील महत्त्वाचा अध्याय संपला: मिलिंद देवरा
“माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्ष जुने नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतुट पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे,” असे ट्विट मिलिंद देवरा यांनी केले होते.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा काय म्हणाले?
तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा म्हणाले की, “हा माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. आज मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षे जुने नाते का तोडले? असे विचारणारे मला सकाळपासून अनेक फोन येत आहेत. सर्वात आव्हानात्मक दशकात मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. काँग्रेस आणि ठाकरे गटाने रचनात्मक आणि सकारात्मक सूचना आणि क्षमतेला महत्त्व दिले असते, तर एकनाथ शिंदे आणि मी आज येथे आलो नसतो. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मला मोठा निर्णय घ्यावा लागला. असे ते म्हणाले.
नाराजीतून देवरा यांनी घेतला हा निर्णय!
तत्पूर्वी, मिलिंद देवरा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दक्षिण मुंबईच्या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. त्यामुळे मिलिंद देवरा हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी आज अखेर काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तर आता आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत यांच्यात लढत रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.