मुंबई, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांनी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून, मिलिंद देवरा यांनी काँगेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वरून दिली आहे. मिलिंद देवरा हे आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/milinddeora/status/1746368092736037291?s=19
मिलिंद देवरा या पोस्टमध्ये काय म्हणाले?
“आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आणले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचे वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे,” असे मिलिंद देवरा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाराज होते!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. त्यामुळे मिलिंद देवरा हे काही दिवसांपासून नाराज होते. या नाराजीतून त्यांनी आज काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान, मिलिंद देवरा हे काँग्रेसकडून 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी देवरा यांचा पराभव केला होता.
मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार?
त्यामुळे 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या जागेवर महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मिलिंद देवरा हे आज एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.