मुंबई, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारावी बोर्ड परीक्षेनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात एमएचटी सीईटी परीक्षा 22 एप्रिल 2024 ते 16 मे 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना http://cetcell.mahacet.org, http://mahacet.in आणि http://mahacet.org या संकेतस्थळावर पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.
37 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
यंदाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात राज्यातील 37 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामधील 20 विद्यार्थ्यांना पीसीएम ग्रुपमधून 100 टक्के गुण, तर 17 विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुपमधून 100 टक्के गुण मिळाले आहेत. एमएचटी सीईटी परीक्षा 2024 साठी पीसीएम ग्रुपमध्ये 3 लाख 14 हजार 675 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 2 लाख 95 हजार 577 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर एमएचटी सीईटी परीक्षा 2024 साठी पीसीबी ग्रुपमध्ये 4 लाख 10 हजार 377 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 3 लाख 79 हजार 800 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
बारावीनंतर सीईटी परीक्षा घेतली जाते
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले होते. त्यानुसार सीईटीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. तत्पूर्वी, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते.