राज्यात उष्णता जाणवत असताना हवामान विभागाचा पावसाचा इशारा

मुंबई, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील सर्वच भागांतील तापमानामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात सध्या भयंकर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात सध्या उष्णतेची लाट असताना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे. यादरम्यान, ताशी 30 ते 40 वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद

तसेच येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश निरभ्र राहील. तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आज नाशिक मध्ये 17.1 अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी किमान तापमान होते. तसेच आजच्या दिवशी सोलापुरात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये आज 42.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

पाहा निवडक शहरांचे आजचे तापमान

दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान आज 40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. सोलापूर पाठोपाठ आज बीड शहरात आज 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नांदेडमध्ये आज 40.2 अंश सेल्सिअस, सांगली 40 अंश सेल्सिअस, लातूर, धाराशिव आणि सांगली 40 अंश सेल्सिअस, पुणे 38.5 अंश सेल्सिअस, मुंबई 33.5 अंश सेल्सिअस, सातारा 38.8 अंश सेल्सिअस आणि कोल्हापूरमध्ये 38.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आवश्यक असेल तर घराबाहेर पडावे. नागरिकांनी स्कार्फ बांधून घराबाहेर पडावे. तसेच छत्री आणि गॉगलचा वापर करावा. याशिवाय नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे आणि पाणी सोबतच ठेवावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *