पुणे, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्र तसेच पुण्यातील तपमानात घट होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
https://twitter.com/anupamkashyapi/status/1753027382959849562?s=19
राज्यासह पुण्यात थंडी जाणवणार!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत सकाळी आणि रात्री खूप थंडी जाणवत आहे. तर दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे दुपारी इतकी थंडी जाणवत नाही. सध्या उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहे. या वाऱ्यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात येत्या 48 तासांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे शहराचा हवामानाचा अंदाज
त्याचबरोबर पुण्यात देखील आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील आकाश अंशतः ढगाळ राहील. तर पुण्यात 5 फेब्रुवारीनंतर सलग 3 ते 4 दिवस आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील 72 तासांत पुण्यात हलके धुके पडण्याची शक्यता राहील. तसेच येत्या 24 तासांत पुण्यातील किमान तापमानात साधारणतः 2 अंश सेल्सिअसने घट होईल. याशिवाय 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात कमाल तापमानात घट होईल त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.