पुणे, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुढील चार ते पाच दिवसांत राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, दि 26 आणि 27 मार्च दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे येत्या दिवसांत उकाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आज अकोला येथे 40.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाची झळ बसत आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1772171307678875959?s=19
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1772169522193084625?s=19
उन्हाचा तडाखा वाढला
यंदा मार्च महिन्यातच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. तर एप्रिल आणि मे महिना अजून यायचा बाकी आहे. सध्याच्या या तापमान वाढीमुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे राज्यातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
या तापमान वाढीमुळे नागरिकांनी महत्वाचे काम नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. घराबाहेर पडताना स्कार्फ बांधावा सोबतच गॉगल, टोपी किंवा छत्री यांचा वापर करावा. उन्हातून घरी आल्यावर नागरिकांनी लगेचच पाणी पिणे टाळावे. याशिवाय आहारात फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करावा.