मेलबर्न, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ आज (दि.28) या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 9 विकेट गमावून 358 धावा केल्या आहेत. यावेळी भारताचे नितीश रेड्डी 105 धावा आणि मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्यामुळे भारत अजूनही 116 धावांनी मागे आहे. दरम्यान, या सामन्यात भारताला फॉलोऑन टाळण्यात यश मिळाले आहे. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला फॉलोऑन टाळता आला.
https://x.com/BCCI/status/1872896273969447417?t=RgQF4XIJbGLhLWWDudYfaA&s=19
रेड्डी आणि सुंदरची 127 धावांची भागीदारी
तत्पूर्वी, बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात 5 गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आज तिसऱ्या दिवशी यामध्ये अजून 194 धावा जोडल्या. परंतु, आजच्या दिवशी भारतीय संघाने 4 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यावेळी रिषभ पंत 28, रवींद्र जडेजा 17, वॉशिंग्टन सुंदर 50 आणि जसप्रीत बुमराह शून्यावर धावांवर बाद झाले. यामुळे भारताची 221 धावांवर 7 विकेट अशी बिकट अवस्था झाली. त्यामुळे फॉलोऑन वाचवण्यासाठी नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीवर मोठे आव्हान होते. त्यानुसार या दोघांनी आठव्या विकेटसाठी 127 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामध्ये नितीश रेड्डीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील पहिले शतक झळकावले. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारत 105 धावांवर नाबाद राहून भारताला फॉलोऑन टाळण्यास मदत केली. वॉशिंग्टन सुंदरने 50 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. या भागीदारीमुळे भारताला खेळात राहण्याची संधी मिळाली.
नितीश रेड्डी तिसरा सर्वात तरूण भारतीय!
या सामन्यात नितीश रेड्डीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील पहिले शतक झळकावले. नितीश ऑस्ट्रेलियात कसोटीत शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरूण भारतीय ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आणि रिषभ पंत आहेत. ऑस्ट्रेलियात शतक झळकावत असताना सचिन तेंडुलकरचे वय 18 वर्षे 256 दिवस होते. याबाबतीत रिषभ पंतचे वय 21 वर्षे 92 दिवस होते. तर नितीश रेड्डीचे वय 21 वर्षे 216 दिवस आहे.