बारामतीत शेतकरी कृती समिती आणि पाटबंधारे विभागाची बैठक

बारामती, 13 सप्टेंबरः निरा डावा कालव्याच्या दुरूस्तीचे काम जलसंपदा विभागाकडून करण्यात येणार आहे. सदर काम सध्या निरा पाटबंधारे आणि सोमेश्वर पंचकोशीमध्ये सुरू झाले आहे. या कामात डावा कालव्याच्या तळासह प्लास्टीक कागद टाकून अस्तरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार पाटबंधार विभागाने सर्व तयारी केली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी होणार गोड

डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाचे टेंडर काढलेले आहे. सदर कामही ठेकेदारांकडून लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी कृती समितीच्या वतीने कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करून ते रद्द होण्यासाठी पुणे सोलापूर पाटबंधारे मंडळचे अधिक्षक अभियंता, सिंचन भवन पुणे, पुणे पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता आणि निरा पाटबंधारे उपविभागचे उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनास अनुसरून, 29 ऑगस्ट 2022 रोजी डावा कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत जलसंपदा विभागाने शेतकरी कृती समितीला त्यांनी दिलेल्या पत्राच्या मुद्द्यांबाबत असमाधानकारक माहिती दिली. त्या अनुषंगाने कृती समितीच्या वतीने आंदोलनाची दिशा कायम असल्याने जलसंपदा विभागाच्या पुणे पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता बारामती येथील पाटबंधारे विभागच्या विश्रामगृह येथे कॅनॉल बचाओ संघर्ष समिती आणि जलसंपदा विभाग यांची जाहीर बैठकीचे आयोजन केले आहे.

शेतकऱ्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी, राजकिय हेवेदावे बाजुला ठेवून अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी सदर बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कृती समिती आणि कॅनॉल बचाओ संघर्ष समितीच्या वतीने सतिश काकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *